Irshalwadi Rehabilitation: अवघ्या दोन वर्षांतच घरांना गळती

पुनर्वसित इर्शाळवाडीत दरडग्रस्तांची व्यथा; शासनाकडे दुरुस्तीसाठी याचना

| रसायनी | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला रविवारी (दि. 19) तीन वर्षे पूर्ण होत असताना पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील संकटांची मालिका अद्याप संपलेली नाही. दरडीत आप्तस्वकीय, घरे आणि संसार गमावलेल्या कुटुंबांसाठी शासनाने नानीवली येथे उभारून दिलेली घरे अवघ्या दोन वर्षांतच गळू लागल्याने पुनर्वसित कुटुंबांवर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. त्यामुळे घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे याचना करण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे.

19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री इर्शालवाडीवर कोसळलेल्या भीषण दरडीने संपूर्ण वाडी उद्ध्वस्त केली होती. या दुर्घटनेत 84 आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले. गुरेढोरे, संसारोपयोगी वस्तू, आयुष्यभराची बचत आणि कुटुंबातील अनेक सदस्य एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. या जखमा आजही ताज्याच असून, अनेक कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या आठवणीत इर्शालगडाकडे आशेने पाहत असल्याचे हृदयद्रावक चित्र आहे. दरड दुर्घटनेनंतर शासनाने नानीवली येथे आपत्तीग्रस्तांसाठी 44 पक्की घरे उभारून त्यांचे पुनर्वसन केले. सुरक्षित निवारा मिळाल्याने नव्याने संसार उभा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, अवघ्या दोन वर्षांतच या घरांच्या छतांना गळती लागल्याने पावसाळ्यात रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घरांच्या छतांमधून पाणी झिरपत असल्याने घरातील साहित्याचे नुकसान होत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ओलसर वातावरणात राहावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमधून कसाबसा बचावलेल्या या आदिवासी कुटुंबांना आता घरांच्या गळतीच्या नव्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. पुनर्वसित ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, शासनाने दिलेल्या घरांमुळे सुरक्षित आयुष्याची अपेक्षा होती; मात्र अल्पावधीतच घरांची गुणवत्ता प्रश्नचिन्हाखाली आली आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून गळतीची दुरुस्ती करावी आणि दोषी ठेकेदारांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरड दुर्घटनेच्या तिसऱ्या स्मृतिदिनी इर्शाळवाडीतील जखमा पुन्हा एकदा उफाळून आल्या आहेत. एका बाजूला आप्तस्वकीय गमावल्याचे दुःख आजही कायम आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाने उभारून दिलेल्या घरांची झालेली दुरवस्था पुनर्वसित कुटुंबांच्या वेदनेत आणखी भर घालत आहे. त्यामुळे केवळ पुनर्वसन करून जबाबदारी संपत नाही, तर त्या घरांची गुणवत्ता आणि देखभालही तितकीच महत्त्वाची असल्याचे या घटनेतून अधोरेखित होत आहे.

Exit mobile version