| म्हसळा | वार्तताहर |
नागरिकांची सुरक्षा हे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी केले आहे.
म्हसळा प्रेस क्लबच्या विद्यमाने म्हसळा पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस कॉनस्टेबल संतोष चव्हाण वर्षा पाटील, मुंडे, नलावडे, किशोर जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाबू शिर्के, पत्रकार संजय खांबेटे, अशोक काते, सुशील यादव, अरुण जंगम, श्रीकांत बिरवाटकर, अंकुश गाणेकर, पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
खांबेटे यांनी प्रास्ताविक केले. संदीपान सोनवणे यांनी प्रेस क्लबच्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. तालुक्यातील नागरिक, विविध संस्था, पत्रकार संघटना, मान्यवर पदाधिकारी यांचे संपूर्ण सहकार्य असल्यामुळे आम्हाला कमी कर्मचारी वर्ग असल्याची खंत वाटत नसून प्राप्त परिस्थितीत तालुक्याची सुरक्षा, शांतता आणि सर्वधर्मीयमध्ये असणारी एकता अबाधित राखण्यात आम्ही यशस्वी ठरत असल्याचे समाधान सोनवणे यांनी व्यक्त केले. तालुक्याला भेदसावणारी कोणतीही लहान मोठी समस्या असेल तर ती तालुक्यातील वरिष्ठ मंडळी, पदाधिकारी यांनी एकत्रित बसून सोडविल्यात पोलीस खात्यातर्फ योग्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन सोनावणे यांनी दिले. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात आणि गावाची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काही सूचना असल्यास त्या निदर्शनास आणून देतात याचाही सोनवणे यांनी आवर्जून केला.