पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांचे प्रतिपादन
| श्रीवर्धन | वार्ताहर |
महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर वाढते अत्याचार ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मुलींनी आता स्वसंरक्षण करणे, ही आता काळाची गरज आहे. श्रीवर्धन येथे आता महानगर गॅस लिमिटेड, सेवा सहयोग फाऊंडेशन अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी लाठी प्रशिक्षण सुरू होत आहे व दोनशे चार मुलींनी लाठी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे, याचा आनंद होतोय, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी केले आहे.
किशोरी विकास प्रकल्प विभाग श्रीवर्धन आयोजित किशोरवयीन मुलींसाठी दर रविवारी लाठी प्रशिक्षण सुरू होत असून, नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी सेवा सहयोग केद्र श्रीवर्धन विभागाचे सुयोग चौगुले, समाजसेविका प्रवीता माने, राजेंद्र वाणी, विजय येलवे आणि शिवरुद्र अकॅडमीचे प्रशिक्षक शैलेश ठाकूर उपस्थित होते.
यावेळी शैलेश ठाकूर, प्रवीता माने, सुयोग चौगुले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीवर्धन समन्वयक अपर्णा बंदरकर यांनी केली, तर आभारप्रदर्शन वैशाली सावंत यांनी केले. यावेळी किशोरी विकास प्रकल्प श्रीवर्धन विभागाच्या सुप्रिया करंजकर, आरती नेवरेकर उपस्थित होत्या.
सोशल मीडियापासून दूर राहा
मुलींनी सोशल मीडियापासून चार हात दूर राहावे, अनोळखी व्यक्तीशी मैत्री टाळावी, गुड टच-बॅड टच ओळखावे, तसेच अनोळखी व्यक्तींनी दिलेले पेय टाळावे, पेयात गुंगीचे औषध असू शकते. मुलींनी मेहनत करावी, यश मिळवावे, आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे, परंतु शॉर्टकटने भविष्य घडवू नका. लाठी प्रशिक्षण आता काळाची गरज झाली आहे. संरक्षण हे आताच्या युगात गरजेचे आहे, असा सल्ला रिकामे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना दिला.