| पोयनाड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे बेन्जो वाजविण्यावरून मारहाणीची घटना रविवारी (दि.15) सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी चार जणांवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोयनाड बाजारपेठ स्टेट बँक समोर, अलिबाग येथे ही घटना घडली. फिर्यादी यांनी आरोपी यांना गणपती विसर्जन करिता बॅजो वाजविण्याची ऑर्डर दिली होती. त्या प्रमाणे फिर्यादी व त्यांचे पथकाने सदर ऑर्डर स्विकारुन बँजो वाजविण्यास सुरुवात केल्यापासून तीन तास बँजो वाजविला जाईल असे आरोपी यास फिर्यादी यांनी बजावुन सांगितले होते. त्याप्रमाणे 15 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन करिता दिलेल्या ऑर्डरप्रमाणे फिर्यादी याचा बँजो पथक व बँजो साहित्यासह चवरकर आळी पोयनाड येथे दोन आरोपीत यांनी सांगितल्याप्रमाणे सायंकाळी साडेचार वाजता बँजो वाजविण्यास सुरुवात केली.
गणपती विसर्जनाची मिरवणुक वाजवित घेवुन जात असतांना बँजो वाजविण्याची वेळ संपली होती, त्यावेळी रात्री साडेनऊ वाजले होते, म्हणुन आरोपी यास बँजो वाजविण्याची वेळ संपली असुन बँजो वाजविण्याचे बंद केले आहे असे फिर्यादीने सांगितल्याने आरोपीत याने बँजो पथकास जाण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे बँजो पथकासह साहित्य घेवुन जाण्यास निघाले असता चार आरोपी यांनी संगनमत करुन बँजो बंद केला. या गोष्टीचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हाताबुक्याने व लाथाने मारण्यास सुरुवात केली त्यावेळी मुख्य आरोपीत याने बँजो पथकातील साहित्यामधील बेस हा हातात घेवुन फिर्यादी याचे डोक्याच्या पाठीमागील बाजुस मारुन दुखापत केली. तसेच लाथांनी मारुन जमिनीवर खाली पाडले तसेच बँजो पथकातील साक्षीदार व इतर सोडविण्यास गेले असता झालेल्या झटापटीमध्ये तिसरा आरोपी यांने साक्षीदार याला मारहाण करीत असताना त्याचे गळयातील सोन्याची चैन तोडुन तसेच बँजो पथकातील साहित्याचे मोडून तोडून नुकसान केले. याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोह मोनिका शेरमकर हे करीत आहेत.