जल्लोष ऑर्केस्ट्राने जिंकली रसिकांची मने

। खांब | वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील उडदवणे येथे शनिवारी (दि.23) संपन्न झालेल्या काळ भैरव जयंती उत्सव प्रसंगी जल्लोष ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. या ऑर्केस्ट्राने रसिकांची मने जिंकून चांगलीच वाहवा मिळवली.

गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यांन पिढ्यांपासून सुरू असलेले जागृत देवस्थान काळ भैरव जयंती उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात व विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत काळ भैरव दैवत अभिषेक व पूजाविधी, श्री.सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रसिकांच्या व भाविकांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध कलाकार आकाश गिजे प्रस्तूत व समाधान फोफेरकर संकल्पित जल्लोष आगरी कोळी कलाकारांचा या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या ऑर्केस्ट्रामधील नामवंत कलाकारांनी आगरी व कोळी भाषेतील व अन्य भाषेतील गीतांचे सादरीकरण करून रसिकांची चांगलीच मने जिंकून घेऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रसिकवर्गाने गर्दी केली असल्याने ऑर्केस्ट्रा अधिकच बहारदार ठरला. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ उडदवणे तसेच तरूण मंडळाने मोलाचे योगदान दिले.

Exit mobile version