जामरूखच्या विद्यार्थिनीचा रेल्वे अपघातात मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील जामरूख गावातील सोनल शिवाजी कोकणे या विद्यार्थिनीला रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. जामरूख गावातील हि विद्यार्थिनी आपल्या मामाच्या गावी जिते येथे राहत असून कॉलेज वरून परतत असताना रेल्वे मार्गाने जात असताना भरधाव वेगाने जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाडीने उडविले. दरम्यान, या अपघातानंतर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणा बिघडली होती आणि त्यानंतर तासाने मध्य रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे.
कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असलेली सोनल कोकणे ही तरुणी तालुक्याच्या शेवटच्या गावी राहत असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी परवडणारे नव्हते.त्यामुळे जामरुख येथून ती आपल्या मामाकडे नेरळ जवळील जिते गावी राहत होती.जिते येथून कर्जत शहरातील अभिनव प्रशालेच्या उच्च महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी सोनल कर्जत येथून जिते येथे घरी जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी उतरली.रेल्वे स्थानकात उतरून रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे मार्गाने पाडा गेट येथे नेहमीप्रमाणे जाण्याच्या रस्त्याने सोनल कोकणे चालत जात होती.त्यात आपण कर्जत वरून आलो असून लगेच कोणतीही गाडी येणार नाही या शक्यतेने ती कर्जत-मुंबई या मार्गावरून पाडा गेट येथील रिक्षा स्टँड कडे जात होती.मात्र त्याच सुमारास कर्जत येथून मुंबई कडे जाणारी 7032 हैद्राबाद एक्सप्रेस ही वेगाने येत होती.त्यावेळी त्या वेगाने येणार्‍या लांब पल्ल्याच्या गाडीच्या धडकेत सोनल कोकणे च्या शरीराचे अनेक तुकडे झाले आणि जागीच मृत्यू झाला होता.
नेरळ रेल्वे स्थानक तेथून 100 मीटर अंतरावर असल्याने तात्काळ पोलीस तेथे पोहचले आणि अपघातग्रस्त जखमी असल्यास तात्काळ उपचार करण्यासाठी नेता येईल अशा परिस्थिती स्ट्रेचर घेऊन पोहचले.मात्र शरीराचे अवयव अस्तव्यस्त पडलेले असल्याने पोलिसांनी सोनल च्या शरीराचे सर्व अवयव उचलले आणि मृतदेह नेरळ स्टेशन वर आणला.तेथे नातेवाईक पोहचल्यानंतर पोलिसांनी शव विच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला.

रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली…
हा अपघात झाला आणि त्याचवेळी वांगणी येथे मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली.त्यामुळे झालेला अपघात आणि त्याआधी बंद असलेले रेल्वे फाटक यामुळे परिसरात वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती.सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर तासाने नेरळ पाडा गेट येथील फाटक उघडले आणि वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका झाली. तर थांबलेली मध्य रेलवे ची वाहतूक देखील पूर्ववत झाली.

Exit mobile version