कसरत थांबणार कधी?; लाईफ जॅकेटचा अभाव
| मुरुड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित जेट्टीची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने पर्यटकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः भरतीच्या वेळी बोटीतून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरताना मोठी कसरत करावी लागते. सध्या अनेक बोटींमधून येणाऱ्या पर्यटकांना लाईफ जॅकेट उपलब्ध नसल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर बंदर अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
किल्ल्याच्या पश्चिम बाजूस आधुनिक जेट्टी उभारण्यात आली असली तरी ती अद्याप पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच प्रवेशद्वारातून धोकादायक पद्धतीने उतरावे लागत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक आल्यास गर्दीमुळे अडचणी वाढतात आणि काही वेळा पर्यटकांना बोटीतच थांबावे लागते.
दरम्यान, अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी प्रशांत राऊळ यांनी लवकरच नवीन जेट्टी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या जेट्टीवर ब्रेकवॉटर भिंत असल्याने लाटांचा प्रभाव कमी होईल आणि पर्यटकांना सुरक्षितपणे उतरणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने सागरमाला योजनेंतर्गत सुमारे 93.56 कोटी रुपये खर्चून या जेट्टीला मंजुरी दिली होती. 2025 मध्ये काम पूर्ण झाले असले तरी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने पर्यटक आणि बोट चालकांमध्ये नाराजी आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येतात. किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर आणि दिघी येथून बोटींची सेवा उपलब्ध आहे. मात्र, सुरक्षित पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. पर्यटक हितेंद्र पंड्या यांनी सांगितले की, कुटुंबासोबत किल्ला पाहण्यासाठी येतो, मात्र तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा आणि समुद्रातील लाटांमुळे उतरण्याचा धोका पाहून भीती वाटते. नवीन जेट्टी सुरू झाल्यास प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. दरम्यान, लवकरात लवकर नवीन जेट्टी सुरू करून पर्यटकांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे, तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






