। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या मोफत लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज दुसर्या दिवशी सहाण आणि सहाणगोठी या गावातील लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ देण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आज लसीकरण केंद्रावर भेट देऊन मोहिमेची पहाणी केली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी लसीकरण मोहिमेचे कौतुक करताना 10 हजार लक्ष्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत अलिबाग तालुक्यात 70 टक्के लसीकरण नजिकच्या काळात पुर्ण व्हायला हवे असे देखील मत व्यक्त केले.
शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे अनेक स्वयंसेवक या लसीकरण मोहिमेसाठी परिश्रम घेत आहेत. ही लसीकरण सेवा मोफत असून खेडोपाड्यातील ग्रामस्थांना लसीकरण केंद्रावर पोहचण्यासाठी मोफत बससेवेची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रासाठी डॉक्टर, परिचारीका, प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात शेकापक्षाच्या स्वयंसेवकासह, सोबो इस्टेट डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड, पीएनपी मेरिटाईम सर्व्हीस, पीएनपी एज्युकेशन सोसायटी, गंधार ऑईल, हॉटेल मॅपल आयव्ही, शेकाप आरोग्य सेल, आयएसएल कोल अॅन्ड मायनिंग यांचाही यात समावेश आहे.
ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या या लसिकरण मोहिमेत संबंधीत निश्चित करण्यात आलेल्या गावानुसारच लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच संबधितांना संपर्क साधुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. आलेले आहे.
3 सप्टेंबर रोजी चेंढरे, 4 रोजी पेझारी, 5 ला आंबेपूर, 6 तारखेला चरी तर 7 सप्टेंबर रोजी हाशिवरे या गावातील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा लाभ दिला जाणार असून दुसरा टप्पा गणपतीनंतर सुरु करण्यात येणार आहे.