हुकूमशाही राजवटीचा पराभव निश्चित- आ. जयंत पाटील

| कोल्हापूर | प्रतिनिधी |
मोदीच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करण्यास प्रागतिक पक्ष एकत्र आले असून मोदी राजवटीचा इंडिया आघाडी निश्चित पराभव करेल असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शविताना लाखोच्या संख्येने शांततेत मोर्चे काढणारा मराठा समाज हिंसक होऊ शकत नाही. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रागतिक पक्षाचा कोल्हापूर विभागीय मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर येथील महासैनिक दरबार सभागृहात सोमवारी (दि.4) रोजी करण्यात आले. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.

यावेळी स्वाभीमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी, प्रा. डॉ. सुभाष जाधव, दिगंबर कांबळे, कॉ. रेहाना शेख, माणिक अवघडे, सतिशचंद्र कांबळे, रामचंद्र कांबळे, राजु दिसले, प्रताग हेगाडे, प्रा. डॉ. जालंदर पाटील, अतुल दिघे, संपत देसाई, माकपचे राज्य सचिव डॉ उदय नारकर, माजी आमदार संपत बापू पवार, वसंतराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे आदी मान्यवरांसह प्रागतिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ. जयंत पाटील सत्यशोध समाजाबाबत बोलताना म्हणाले, आज पुन्हा एकदा सत्यशोधक समाजाच्या विचारांची गरज आहे. प्रागतिक पक्षाच्या आघाडीतील सर्वच पक्ष सत्यशोधक समाजाचा विचार मानणारे आहेत. आमची ताकद कमी असेल, आमचे बालेकिल्ले मर्यादित असतील, परंतु आमचा विचार पक्का आहे. दलित अल्पसंख्यांक बहुजन कष्टकरी समाजाशी असलेली आमची बांधिलकी आम्ही कधीच सोडलेली नाही. इंडिया आघाडीबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले, आमचा विचार उठून दिसणारा आणि इंडिया आघाडीला दिशा देणारा ठरणार आहे, यात शंका नाही.

महत्वाचे म्हणजे इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रागतिक पक्षाचा विचार उचलून धरला आहे. 85 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारी इंडिया आघाडी मोदीच्या हुकूमशाही राजवटीचा पराभव करेल, असा विश्वास आहे. एक देश एक निवडणूक हे धोरण स्वीकारले तर या विविध विचारांच्या पक्षांचे अस्तित्वच संपेल. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून केंद्राचीच हुकूमशाही येईल. यासाठीच आमचा एक देश एक निवडणूक या धोरणाला तीव्र विरोध आहे.

मराठा समाजाची राज्यकर्त्यांनी कायमच फसवणूक केली आहे. लाखोंचे मोर्चे शांततेत काढणारा समाज दंगल करेल अशी शक्यता नाही. आंदोलकांवरील हा आरोप आम्हाला मान्य नाही.आम्ही हा आरोप फेटाळून लावतो आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, अशी मागणी करतो. केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देऊन 50 टक्केची मर्यादा मोडली आहे. जातीनिहाय जनगणना करा आणि ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवा. मराठा समाजालाही त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्या अशी आमची आग्रही मागणी असे आ. जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version