। मुंबई । प्रतिनिधी ।
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्यांना दोन मजुरांना धडक दिली. यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला असून उर्मिलासह तिचा कारचालकही जखमी झाला आहे.
हा भीषण अपघात मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ शुक्रवारी (दि. 27) घडला. शुटींगवरुन घरी परतत असताना अभिनेत्री उर्मिलाच्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. तसेच उर्मिलासह तिचा कारचालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.