कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहराला लागून असलेल्या मालवाडी भागातील हॉटेल व्यवसाय करणारे सचिन प्रकाश सोनावळे यांच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून तब्बल सव्वा सात लाखाचे सोने लंपास करण्याची घटना घडली आहे.

मालवाडी येथे राहणारे सचिन सोनावळे यांच्या घरात त्यांचे सर्व कुटुंबीय १८ एप्रिल रोजी रात्री झोपी गेले होते.त्यावेळी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास किचन चे खिडकीतून अज्ञात लोक घरात घुसले.त्या अज्ञात चोरट्यांनी सचिन सोनावळे यांच्या घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटात फोडले आणि त्यात असलेली तिजोरी उघडून चोरी केली.सकाळी सात वाजता सोनावळे कुटुंब झोपेतून उठल्यानंतर सदर घटनेची माहिती मिळाली.त्यानंतर कर्जत पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि कर्जत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.सचिन सोनावळे यांच्या घरातून चोरट्यांनी तिजोरी मध्ये ठेवलेले दागिने लंपास केले.चोरट्यांनी त्या ठिकाणी लोखंडी कपाटात असलेल्या तिजोरी मधून सोन्याचे दागिने लंपास केले.त्यात सोन्याची गंठण,सोन्याची माळ,सोन्याचा हार,कर्णफुले,सोन्याचा नक्षी हार, सोन्याचा लक्ष्मी हार,सोन्याची रिंग,सोन्याच्या पाच अंगठ्या,नथ असे साहित्य चोरून नेले.त्याचवेळी सात हजारची रोकड देखील चोरट्यांनी चोरून नेली असून या घरफोडी मध्ये साधारण सात लाख १८ हजाराचा माल चोरून नेण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी डॉग स्कोड यांना पाचारण करून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.तसेच शोध पथक तयार करण्यात आले असून माल वाडी येथील सचिन प्रकाश सोनावळे यांच्या तक्रारीनंतर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(१),३३१(४)नुसार गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.पोलीस उप अधीक्षक डी डी टेले आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक जयवंत वारा अधिक तपास करीत आहेत.
