। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नळपाणी योजना राबविली जात आहे. या नळपाणी योजनेचे काम गेली दोनवर्षे सुरु आहे. तरीदेखील नळपाणी योजनेचे काम संथगतीने सुरु असून मागील तीन महिने बंद असलेले जलवाहिनी टाकण्याचे काम पुन्हा सुरु झाले आहे. परंतु, हे काम पावसाळा सुरु होण्याच्या तोंडावर सुरु झाले असल्याने शिसवणे ठाकरे गटाने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील गावांसाठी 50 कोटींची नळपाणी योजना महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरण कडून राबवविली जात आहे. या नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ मे 2023 मध्ये झाला असून आता दोन वर्षे होऊनही नळपाणी योजनेचे काम 50 टक्के पुढे गेलेले नाही. या नळपाणी योजनेच्या कामासाठी शासनणे 18 महिन्यांचा कालावधी दिला होता आणि आता दोन वर्षे पूर्ण झाली असून नळपाणी योजनेचे काम अर्धे देखील पूर्ण न झाल्याने स्थानिक रहिवाशी यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यात जुनी नळपाणी योजना सतत नादुरुस्त होत असल्याने ग्रामपंचायत हद्दीमधील अनेक रहिवाशानाना पिण्याचे पाणी अगदी कमी दाबाने मिळत आहे. त्यामुळे गावातील रहिवाशी नळपाणी योजना राबविण्यात अयशस्वी ठरत असलेले जीवन प्राधिकरण आणि नेरळ ग्रामपंचायतीवर नाराज आहेत.