। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग वनविभागातील वनरक्षक वनपाल पदावरील कर्मचार्यांच्या 2025-26 या कालावधीतील बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारी (दि.30) पार पडली. दरम्यान, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना शाखा अलिबागकडून 29 मे रोजी संबंधित बदलिपात्र कर्मचार्यांना शक्यतोवर त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदली करण्याची विनंती अलिबाग प्रादेशीक उप वनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या विनंतीची दखल घेऊन प्रत्येक बदलिपात्र कर्मचार्यांना त्यांनी प्रत्यक्ष आपल्या दालनात बोलावून घेऊन त्यांचे म्हणने ऐकून त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांची बदली करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, बदलीसाठी कुणाचेही पाय न धरणे आणि कुणालाही आर्थिक देवाण-घेवाण न करण्याचे आव्हान देखील त्यांनी केले होते.
शुक्रवारी अलिबाग वनविभागातील बदलीपात्र 54 वन कर्मचार्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे ऐच्छिक स्थळी बदली करण्यात आली आहे. निःपक्षपाती, कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण न करता, कुणाची हाजी-हाजी न करता कर्मचार्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचार्यांचा सन्मान, गरिमा ठेवून बदल्या केल्या आहेत. आजपर्यंत अशा पद्धतीने कधीच बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे वनविभाग अलिबागच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वनविभागातील ही ऐतिहासिक घटना असल्याचे महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा अलिबागचे प्रतिनिधी एम.डी. तायडे यांनी सांगितले आहे.