। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीत 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला. यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे सात कामगार जखमी झाले. त्यापैकी चार कामगारांचा मृत्यू झाला, तर तिघांवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर ठेकेदार व कंपनीने मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देत प्रकरण रफादफा केले. मात्र, तीन महिने उलटूनही त्यांना एकही रुपया दिला नव्हता.
अखेर मृत व्यक्तींच्या कुटूंबियांनी ही बाब कृषीवलच्या निदर्शनास आणून देताच कृषीवलने जेएसडब्ल्यू कंपनीसह ठेकेदारालाही धारेवर धरले. त्यामुळे ठेकेदाराने 15 लाखांपैकी 9 लाख रुपये कुटुंबियांच्या खात्यात जमा केले असून, उर्वरित 6 लाख रुपये महिनाभरात देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, कृषीवलने केलेल्या सहकार्याबद्दल कुटुंबियांनी आभार मानले. जेएसडब्ल्यू कंपनीत झालेल्या अपघातात चंदनकुमार ननहक महता, जितेंद्र योगेंद्र राय, ईरशाद वकील अन्सारी व योगेंद्रकुमार संभू महतो या चौघांचा मृत्यू झाला. यापैकी योगेंद्रकुमार महतो याचा 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात मृत्यू झाला. हे सारे कामगार जेएसडब्ल्यू कंपनीने नेमून दिलेल्या जे.पी.म्हात्रे यांच्या शिवदत्ता एन्टरप्रायझेस या ठेकेदारामार्फत कंपनीत काम करीत होते.
अहवालाची प्रतीक्षा
या अपघातानंतर वडखळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पीडित कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदतही देण्याचे कंपनी व ठेकेदाराने मान्य केले. मात्र, अपघाती मृत्यू असताना अकस्मात मृत्यूची नोंद का केली, याबाबत कुटुंबियांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे याबाबत पोलिसांना विचारणा केली असता या अपघातानंतर अधिकार्यांकडून देण्यात येणारा अहवाल अद्याप पोलिसांना दिला नसल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
तारीख पे तारीख
शिवदत्ता एन्टरप्रायझेसचे जे.पी. म्हात्रे हे जेएसडब्ल्यू कंपनीला कामगार पुरवितात. हा अपघात झाल्यानंतर कंपनीकडून 15 लाख रुपये प्रत्येकी दिले जातील, असे म्हात्रे यांनी कुटुंबियांना सांगितले होते. मात्र, ठेकेदाराने चार महिन्यांनंतर पीडित कुटुंबियांना नऊ लाख रुपये दिले. तसेच उर्वरित सहा लाख रुपये पुढील महिन्यात दिले जातील, असे सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे गेले चार महिने नातेवाईकांना तारीख पे तारीखच मिळत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अपघात घडल्यानंतर मृतदेह गावाला नेण्यासाठी ठेकेदार व कंपनीने 50 हजार रुपये प्रत्येकी दिले. त्यानंतर चार महिन्यांनंतर प्रत्येकी नऊ लाख रुपये कुटुंबियांच्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित सहा लाख रुपये पुढील महिन्यात देणार असल्याने प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कमलेशकुमार नवल महतो,
तक्रारदार तथा कामगार