। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 हजार 496 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनांपैकी 522 पाणी योजना अद्यापही अपूर्णच असल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच लोकांकडून पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाही रायगडच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या माहितीनूसार 1,496 योजनांपैकी 751 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर 223 योजनांची कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही 522 पाणी योजना अपूर्णच असल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. कामांना भेटी देऊन कामाची पाहणी केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
या योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये 1 हजार 496 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील 751 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पुढील काही दिवसात उर्वरित योजना पूर्ण करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापासून जलजीवन योजना राबवण्यात आली आहे. काही गावांमध्ये नळ आहे, तर पाणी नाही, अशी अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टाकी खराब झाली आहे. योजना पुर्ण होऊनही पाणी दिले नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अपुर्ण पाणी योजनांची कामे कधी पुर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपुर्वी स्थानिकांना डावलून बाहेरील ठेकेदारांचे योजनांच्या कामांचे बील दिल्याचा गोंगाट झाला होता. त्यामुळे पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशीही मागणी काही संघटनांकडून केली जात आहे.
बिले न दिल्याने वेग मंदावला?
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. कंत्राटदारांची कोट्यवधींची बिले न दिल्याने त्यांनी जलजीवन योजनांची कामे थांबवली आहेत किंवा या योजनांचा वेग कमी केला आहे. त्यामुळे या योजना अपूर्ण असल्याचे कळते.
जलजीवन मिशन अंतर्गत 751 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार, अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.