| मुंबई | प्रतिनिधी |
वरळी येथील कोस्टल रोड सी- लिंक कनेक्टरवर मोटरगाडी उभी करून 30 वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागरी सेतू परिसरात तरूणाचा मृतदेह बुधवारी (दि.19) सापडला असून, याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृत तरूण मालाड येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडला वांद्रे – वरळी सागरी सेतूशी जोडणाऱ्या कनेक्टरच्या पोल क्रमांक 80 च्या शेजारी एक मोटरगाडी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास उभी करण्यात आली होती. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासणी केली असता एक व्यक्तीने तेथून उडी मारल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बोटीच्या साहाय्याने सर्वत्र शोध घेतला, पण रात्र झाल्यामुळे काहीच सापडले नाही. अखेर मोटरगाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी माहिती घेतली असता दर्शीत राजूभाई सेठ (30) हा तरुण मोटरगाडी घेऊन तेथे गेल्याचे समजले. अखेर पोलीस निरीक्षक शिंदे व वरळी मोबाईल व्हॅन क्रमांक 1 ने घटनास्थळी पाहणी केली. बुधवारी सी- लिंक लॅन्डिंग पॉईंट येथे एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल 1 वाहन घटनास्थळी पाठवले. त्यावेळी तेथे एक मृतदेह पाण्यात तरंगत होता. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दल व रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावले. त्यानंतर अग्निशमन दलाने वाहनाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात नेला असता तेथील डॉक्टरांनी तरूणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर वरळी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. चार महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.