खारभूमी विभागाचा निष्कर्ष; प्रांतांना पत्र देऊनही कारवाई नाही
| पेण | प्रतिनिधी |
नारवेल-बेनवले खारबंदिस्ती 16.44 कि.मी. लांबीचा काम वर्ल्ड बँकेच्या मदतीने सुरू आहे. परंतु, या खारबंदिस्तीला वारंवार खांडी जात असल्याने अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला रोशाला सामोरे जावे लागत आहे. तालुका प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. मात्र, 24 डिसेंबर 2021 चा उपविभागीय अधिकारी खारभूमी यांचे पत्र ‘कृषीवल’च्या हाती लागले असून, या पत्रानुसार जेएसडब्ल्यू कंपनीद्वारे खाडीमध्ये होणाऱ्या मालवाहतूक जहाजांची होत असणारी सतत ये-जा व त्यामुळे खाडी खोदाईचा फटका बंदिस्तीला बसत आहे, असे या अर्जात नमूद करून तो अर्ज कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण, पेण तहसीलदार, पेण उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना दिला आहे.
या अर्जानुसार जागतिक बँक अनुदानातून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत नारवेल-बेनवले खारभूमी योजना, ता. पेण या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. योजनेचे काम करत असताना काही भागामध्ये बांधाचा भराव खाडीमध्ये घसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी सा.क्र. 7,620 मी.ते 8,160 मी.चा बांध हा धरमतर मुख्य खाडीच्या मुखाशी आहे. खाडीलगतचा भाग हा अत्यंत दलदलीचा असून, येथील जमिनीला सुमारे 25 ते 30 मी. खोलीपर्यंत राहण्याकरिता कंपनीकडून खाडीमध्ये खोदकाम होत असते. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा व जहाजांपासून निर्माण होणाऱ्या लाटांचा मोठ्या प्रमाणावर एकत्रित मारा बांधाला होत आहे. त्यामुळे योजनेच्या खाडीकडील बाजूची जमीन व त्याचबरोबर बांधाच्या पायामधील जमीन खाडीमध्ये सरकत आहे आणि म्हणून सोबत योजनेचा बांधही खाडीमध्ये घसरत आहे. तरी, समुद्राचे लाटांच्या माऱ्यामुळे भविष्यात बांध फुटून खाडीचे बाजूस दगडी संरक्षक भराव करणे आवश्यक आहे, याला कायमस्वरूपी उपाय म्हणून खाडीकडील बाजूस दगडी संरक्षक भराव करणे आवश्यक आहे. जेणे करून पुढील काळात बांधाचे संरक्षण होऊन लाभ क्षेत्रातील शेती व घरांना होणारा धोका टाळता येईल. तरी जेएसडब्ल्यू कंपनीच्या जहाजांमुळे खारभूमी योजनेचे बांधाचे नुकसान होत असल्याने जहाजांची वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवावी अथवा खाडीतील खोदाई थांबवावी.
याचाच अर्थ उपविभागीय अधिकारी खारभूमी यांना खारबंदिस्तीला धोका आहे हे 2021 लाच समजले होते. तशा प्रकारचे पत्रव्यवहारदेखील झालेला असताना जेएसडब्ल्यू कंपनीविरूद्ध कारवाई का झाली नाही, हा संशोधनाचा विषय आहे. आजच्या घडीला खारबंदिस्तीचा ठेकेदार, खारभूमीचे अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन यांची मोठी दमछाक होत आहे. गाव पुढारी आपापल्या परीने सर्वांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. पण, यातील खरा दोषी असणारा घटक बाजूलाच राहात आहे एवढे निश्चित.
आजच्या घडीला 7,320 ते 8,130 मीटर बांध हा धरमतरच्या मुख्य खाडीच्या मुखाशी आहे. तर इतर भाग हा जरी उपखाडयांत असला तरी मंथन गतीच्या प्रभावामुळे कितीही खारबंदिस्तीचे काम योग्यप्रकारे केल्यास ती खाडीच्या बाजूने सरकतच जाईल. यासाठी खाडी मुख बांधणी व गडगे बांधणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धरमतरच्या खाडीतील खोदाई थांबणेही गरजेचे आहे. या बाबीकडे जिल्हा प्रशासनाने योग्य लक्ष दिले नाही तर काळेश्रीपासून वासखांडीपर्यंत येणारी गावे काळेश्री, कान्होबा, तुकाराम वाडी, विठ्ठलवाडी, मोठेभाल, घोडाबंदर, तांबशी बंदर, बहिरम कोठक, वाशी यांसह आतल्या बाजूने असलेली गावे म्हणजे वढाव, मोठे वढाव, मंत्री बेडी, ठाकूर बेडी, जनवली, बेनवले, यासह जवळपास छोट्या मोठ्या दहा ते पंधरा वाड्यांमधील जनजीवन विस्कळीत होत असून, भविष्यात दुर्दैवाने खारबंदिस्ती फुटल्यास या गावांच्या ग्रामस्थांना विस्तापित करण्याची वेळ येईल. मात्र या बाबींकडे लोकप्रतिनिधींना लक्ष द्यायला वेळ नाही. खासदार सुनिल तटकरेंना तर खारेपाट निवडणुकीच्या वेळेलाच आठवतो. या खारेपाटावर येणाऱ्या अस्मानी संकटांच्या वेळी साधी भेट देण्याची तसदीही घेता येत नाही. तर स्थानिक आ. रविशेठ पाटील यांना जेएसडब्ल्यूविरूध्द एक ब्र शब्द ही काढता येत नाही.
जेएसडब्ल्यू कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात खारेपाटाचे नुकसान झाले आहे. आजच्या घडीला खारेपाटातील मत्स्यव्यवसाय, शेती व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वारंवार खारबंदिस्ती घसरत असेल तर, त्याचे मूळ कारण शोधणे गरजेचे आहे आणि ते मूळ कारण म्हणजे जेएसडब्ल्यू कंपनीची धरमतरच्या खाडीमध्ये होत असणारी खोदाई हेच आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यूची खोदाई त्वरित थांबणे गरजेचे आहे. अशाप्रकारचे पत्रव्यवहार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेले आहेत.
ॲड. काशिनाथ ठाकूर