| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील सुमित्रा राज रुग्णालयात नवजात बालकाच्या मृत्यूनंतर चुकीचे औषध दिल्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी आपली बाजू मांडत या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगिता केजरीवाल यांनी केली आहे.
नुकतेच खोपोलीतील सुमित्रा राज रुग्णालयात नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप करत रुग्णालयात तोडफोड केली होती. या घटनेची माहिती देण्यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत केजरीवाल आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगिता केजरीवाल यांनी बुधवारी (दि.7) पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. संगिता केजरीवाल यांनी सांगितले की, शाहिस्ता मुस्तफा जळगावकर यांची आठ दिवसांपूर्वी याच रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली होती. मंगळवारी (दि.6) दुपारी सुमारे 12.00 वाजता त्या ड्रेसिंगसाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे सासरेही होते. यावेळी डॉ. जयंत केजरीवाल यांनी तपासणी केली असता बालकाला कावीळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ‘लिव्ह 52’ ड्रॉप्स लिहून देण्यात आले. नातेवाईकांनी मेडिकलमधून औषध आणून डॉक्टरांना दाखविले.
औषध योग्य असल्याचे सांगून बालकाला चार थेंब देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर शाहिस्ता जळगावकर बालकाला घेऊन रुग्णालयातून निघून गेल्या. सुमारे दोन तासांनंतर बालकाची प्रकृती खालावल्याने त्या पुन्हा बालकाला घेऊन रुग्णालयात आल्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप डॉ. केजरीवाल यांनी केला. दरम्यान, डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध रुग्णालयात देण्यात आलेले नव्हते. नातेवाईकांनी ते घरी गेल्यानंतर बालकाला दिले की नाही, याबाबत आम्हाला माहिती नाही. त्यामुळे बालकाचा मृत्यू केवळ त्या औषधामुळेच झाला, असे सांगणे योग्य नाही, असा दावा डॉ. संगिता केजरीवाल यांनी केला. त्यामुळे नवजात बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, औषधाचा त्याच्याशी काही संबंध होता का? आणि उपचार प्रक्रियेत काही त्रुटी झाली का, याची पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी डॉ. केजरीवाल दाम्पत्याने केली आहे.







