चार वर्षे प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही; केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
| रायगड |आविष्कार देसाई |
विकासाच्या नावावर कांदळवनांची होणारी कत्तल थांबवण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने घोषा लावण्यात येतो. त्यानुसार चार वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबाग-वरसोली येथे पाच हेक्टर आणि तळा तालुक्यात मांदाड येथे दहा हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उभारण्याचे नियोजन होते. आपत्ती व्यवस्थापनामार्फत सदरचा प्रस्तावदेखील पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने या प्रस्तावाकडे साधे ढुंकूनही पाहिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कांदळवन संवर्धन प्रकल्पाला हरताळ फासले गेल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये झपाट्याने विकास होत आहे. स्वैर विकासाच्या नावावर निसर्गलाच गिळंकृत करण्याला मागे-पुढे पाहिले जात नाही. हजारो हेक्टर सुपीक जमिनींवर बुलडोझर फिरवला जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीचे क्षेत्र नष्ट होतेच. त्याचप्रमाणे कोट्यवधी कांदळवनांच्या झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. निसर्गाचा समतोल राखला नाही, तर निसर्ग आपल्याला धडा शिकवतो, हे वेळोवेळी आलेल्या आपत्तीवरुन आपल्याला दिसून येईल. एखादी आपत्ती आली की, केंद्रातील सरकारसह त्या-त्या राज्यातील सरकार आपण याप्रश्नी किती गंभीर असल्याचे भासवतात. त्यानंतर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जातात.
जिल्ह्यात कांदळवनांचे संवर्धन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने चार वर्षांपूर्वीच पावले टाकली आहेत. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे पाच हेक्टर आणि तळा तालुक्यातील मांदाड येथे दहा हेक्टर अशा एकूण 15 हेक्टर जागेत कांदळवन उभारण्यात येणार आहे. तब्बल 52 लाख 35 हजार रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्र सरकारला मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाला गती आली असल्याचे दिसून येत नाही.
कांदळवन म्हणजे काय?
कांदळवन (खारफुटी) ही एक समुद्र आणि खाडीकिनारी वाढणारी वनस्पती आहे. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणार्या भागात मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वाढते. मोठ मोठ्या लाटांमुळे होणारी जमिनीची धूप थांबवण्याचे प्रमुख काम ते करतात. खारफुटीच्या विस्तृत समूह मोठ्या प्रमाणात वाढता आणि स्थिरावतो, त्यांना कांदळवन म्हणतात.
अन्नसाखळी रक्षणाचे काम
कांदळवनामुळे सागरी अन्नसाखळी अधिक मजबूत होते. त्सुनामी किंवा वादळी वार्याचा वेग मोठ्या प्रमाणावर अडविण्यास मदत होते. खेकड्यासारख्या विविध जलचरांना, बगळे, स्विफ्ट, कावळे, घार, किंगफिशर, हॉर्नबील यासारख्या विविध प्रकारच्या पक्ष्यांकरिता अन्नसाखळीस पोषक वातावरण तयार होते. कांदळवन हे सदाहरीत असल्याने त्यांची पानगळ होत नाही.
केंद्र सरकारल प्रस्ताव सादर
निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कांदळवनांच्या सुरक्षेसाठी सरकारस्तरावर कार्यवाही सुरु करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारला सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव राज्य सरकाकडून अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण-नवी दिल्ली यांना पाठविण्यात आला होता.
ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा, वसई, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यातील डोकमाळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर तलेरे, मुंगे तलेरे अशा ठिकाणीदेखील कांदळवन उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.