। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात रविवारी 22 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्हा शालेय क्रिडा स्पर्धा 2024 चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीवर्धन तालुका गट शिक्षणाधीकारी धामणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला तालुका क्रिडा समन्वयक, विजय मर्चंडे, प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख केतकर, क्रिडा पंच प्रमुख समीर वाळवटकर, गोखले कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख, प्रा. नवज्योत जावळेकर, न्यु मॉडर्न स्कूल आराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली सावंत तसेच श्रीवर्धन तालुक्यातील सर्व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांचे क्रिडा-शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य किशोर लहारे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच क्रिडा स्पर्धांमधून आपल्या बरोबरच आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले. शिक्षणाधिकारी धामणकर यांनी या क्रिडा स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन केले. या प्रसंगी प्रा. जावळेकर यांनी सर्वांचे आभार मानले. या क्रिडा स्पर्धांच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व गोखले शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.