। वावोशी । वार्ताहर ।
कर्जत येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. कर्जत-खालापूरमध्ये एक ‘आका’ कार्यरत आहे आणि त्याला आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, या शब्दांत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड कोण आहेत, हे आम्ही शोधून काढू असे सांगत राजकीय गैरव्यवहारांचीदेखील पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे.
सुधाकर घारे यांनी कर्जत-खालापूरमधील स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील बीड किंवा बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे, त्यापेक्षाही कर्जत-खालापूरमध्ये भयंकर राजकीय अराजक माजले आहे. इथे फक्त पक्षपाती राजकारण चालते, सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकण्यास कोणी तयार नसल्याची टीका त्यांनी केली असून, संभाजी महाराजांच्या हत्येबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येचा आदर्श घ्यावा, असे म्हणणार्या लोकप्रतिनिधींना जनता योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही घारे यांनी म्हटले आहे. सुधाकर घारे यांनी वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव कर्जत रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी लावून धरली. जर शासनाने यावर त्वरित निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
राजकीय भूकंप होण्याची शक्यता
सुधाकर घारे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे कर्जत-खालापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. लवकरच आणखी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही महेंद्र थोरवे यांची संपूर्ण पोलखोल करू, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा थोरवे यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.