कशेडी घाटातील भुयारी मार्ग अंतिम टप्प्यात

। पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीपासून पेण हद्दीतील कोलेटी गावापर्यंतचे, तसेच लोणेरेपासून टेमपाले लाखपाले वीरपर्यंत चौपदरीकरणासाठीचे भूसंपादन रखडलेल्या अवस्थेत असल्याने प्रत्यक्ष कामाला गती दिसून येत नाही. दुसरीकडे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील पर्यायी भुयारी मार्ग पुढीलवर्षी पूर्ण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. चौपदरीकरणाचे काम आर्थिक चणचणीमुळे भूसंपादन न झाल्याने ठप्प झाले असल्याचे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी जन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्पष्ट करून जन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीपासून पेण हद्दीतील कोलेटी गावापर्यंतचे चौपदरीकरणासाठीचे भूसंपादन अद्याप रखडलेले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी जनआंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कोव्हिड काळातील नियमांचा हवाला देत आंदोलनाला कोव्हिड पार्श्‍वभूमीवर आलेल्या निर्बंधाचा पाढा पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी एका पत्राद्वारे वाचल्यानंतर पोलादपूर येथील आपत्तीनिवारणकामी प्रतिनियुक्तीवर ते पोलादपूर तहसील कार्यालयामध्ये आले असता पालकर यांनी त्यांची जनआंदोलनावर ठाम असल्याचे मत मांडले.

कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहे. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारी मार्गामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला जात असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असणार आहेत. या कामाची पाहणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 14 जुलै 2019 रोजी अभियंत्यांसोबत केली असून, तब्बल दोन वर्षांच्या कालावधीने दोनपैकी एक भुयार आरपार खुले झाले आहे.

पुढील वर्षी 2022 मध्ये या भुयारी मार्गापर्यंत जाणार्‍या काँक्रीट रस्त्याचे तसेच भुयाराच्या आतील भागातील काँक्रीटीकरणासह खेडबाजूकडे 4 पूल आणि पोलादपूरबाजूकडे तीन पुल उभारण्याचे काम झाल्यानंतर ऍप्रोच रस्ता पूर्ण होणार आहे. आगामी 2022 मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग किमान कोकणापर्यंत रस्ता आणि पुल तसेच भुयारासह परिपूर्ण होऊन लोकार्पण होईल, अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version