29 लाखांचा बूस्टर पंप ठरला फुसका?; खर्च झाला, पण टंचाई कायम
| पेण | प्रतिनिधी |
खारेपाट परिसरातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मोठ्या गाजावाजात मुख्य जलवाहिनीवर बसवलेला बूस्टर पंप अद्याप निष्प्रभ ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल 29 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या यंत्रणेचा पंधरा दिवस उलटूनही नागरिकांना कोणताही ठोस फायदा झालेला नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींच्या योजना कागदावरच, पण नळ मात्र कोरडेच, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खारेपाट भागात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा दाब वाढवून अधिक प्रमाणात पाणी नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मुख्य जलवाहिनीवर बूस्टर पंप बसविण्यात आला होता. जिल्हाधिकारी आपत्कालीन टंचाई निधीतून यासाठी सुमारे 29 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, एवढा निधी खर्चूनही नागरिकांच्या नशिबी अजूनही अपुरा पाणीपुरवठाच येत असल्याने नाराजी वाढू लागली आहे.
प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नळांना अत्यल्प दाबाने पाणी येत असल्याची तक्रार कायम आहे. काही ठिकाणी नागरिकांना अजूनही टँकर किंवा पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बूस्टर पंपाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा शाखेच्या उपअभियंता एस.एस. देशमुख यांनी घटनास्थळी भेटीदरम्यान सांगितले की, बूस्टर पंप सुरू करण्यात आला असून, पाण्याचा दाब वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीतील दाब संतुलन आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी काही कालावधी लागत आहे. विभागाकडून सातत्याने पाहणी आणि तांत्रिक सुधारणा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना लाखो रुपयांचा खर्च करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाने नेमकी कोणती उपाययोजना केली, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
