। माणगाव । प्रतिनिधी ।
हिम्मत असेल तर तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खा. सुनील तटकरे यांना माणगाव येथे बोलताना दिले.
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे व माणगाव तालुका शिवसेना युवासेनेचा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय माणगाव येथे तहसील कार्यालयाशेजारी वेदपाठक प्लाझामध्ये सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा उद्घाटन अनंत गीते यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 29) सायंकाळी पाच वाजता करण्यात आले. याप्रसंगी अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला.
अनंत गीते पुढे म्हणाले, लोकसभेची आचारसंहिता येत्या 10 ते 12 तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. सध्याचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र पाहता दुर्दशा झालेली आहे. सुज्ञ नागरिकांत, जनतेत कमालीची नाराजी व चीड आहे. या सरकारने नीचपणाचा तळ गाठला आहे. राजकारण व राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात फार संताप महाराष्ट्रात सर्वत्र आहे. एकेकाळी देशात अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्राची आताच्या राज्यकर्त्यांनी दयनीय अवस्था केली आहे. केवळ सत्तेसाठी भाजपने शिवसेना फोडली. यावर ते गप्प बसले नाहीत. त्यानंतर राष्ट्रवादी फोडली व आता काँग्रेसही फोडली. देवेंद्र फडणवीस यांची भूक क्षमत नाही. 288 पैकी 185 आमदार त्यांच्यासोबत असताना त्यांची भूक थांबत नाही, त्यांचा आटापिटा सुरू आहेत.
माझी उमेदवारी रायगडमधून तीन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन येथे आरडीसीसी बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली. मात्र, विरोधकांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. भाजपने राज्यात सर्वे केला. त्या सर्वेत त्यांना तटकरे हे माझ्यासमोर 1 लाख 20 हजार मतांनी पडतील असे दिसले. तर, भाजपचा उमेदवार हा माझ्यासमोर 80 हजारांच्या फरकाने पडेल, असे दिसले. हिम्मत असेल तर तटकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान तटकरेंना दिले.
ते म्हणाले, आपले नेते उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत असून, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट आहे. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख संजय कदम, माजी आमदार तुकाराम सुर्वे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, युवक नेते अमित मोरे, जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. स्विटी गिरासे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाड मतदारसंघ युवासेना संघटक रोहित पारधी, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, तालुका संघटक सीताराम मेस्त्री, संपर्कप्रमुख बळीराम घाग, ज्योत्स्ना दिघे, हनुमंत जगताप, लोणेरे माजी सरपंच प्रभाकर ढेपे, नथुराम बामनोलकर, मधुकर नाडकर, लहू पाटील आदींसह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनंत गिते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.