किशोर साळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आपण ज्या शाळेत, शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतो. त्या शैक्षणिक संस्थेचा डंका देशभर कसा गाजवता येईल, याकडे विद्यार्थ्यानी लक्ष देणे गरजेचे आहे. क्रीडा स्पर्धांमधून मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. कठोर परिश्रम करून यश संपादन केले पाहिजे. आपल्या खेळातून, कर्तृत्वाने महाविद्यालयाचे नावलौकिक करा, असे प्रतिपादन अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा संकुलात मंगळवारी (दि.17) क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता समारंभ अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी किशोर साळे म्हणाले की, जोपर्यंत संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवत नाही. तोपर्यंत आपण कोणत्याही संकटाशी सामना करू शकत नाही. कोणतीही गोष्ट अवघड नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सहज यश मिळविण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे. खेळाडूवृत्ती कायम असु दे. त्याचा फायदा करिअरमध्ये होणार आहे. विविध शासकीय नोकर्यांमध्ये खेळाडूंसाठी जागा असते. त्याचा खेळाडूंना फायदा होतो. शाळा महाविद्यालयांमध्ये होणार्या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळते. त्या संधीच विद्यार्थ्यांनी सोने करायचे आहे.
पुढे म्हणाले की, खूप चांगले उपक्रम आपल्या संस्थेमार्फत घेतले जातात. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतलेले मेहनत या परिसरातील वातावरणातून दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त, शाळेतील परिसरामुळे महाविद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामध्ये शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे यश आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत शाळेचे नाव आणखी मोठे करण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे आवाहनदेखील साळे यांनी केले आहे.
यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रविंद्र पाटील, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, मुख्य कार्यालयाच्या मनिषा रेलकर, अमोल नाईक, इंग्रजी माध्यम अॅकॅडमिक को ओर्डीनेटर श्रुती सुतार, राजश्री पाटील, संकुलातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.