केएल राहुल होतोय सज्ज

नेटमध्ये करतोय सराव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे अंतिम वेळापत्रक आले नसले, तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी नक्कीच आली आहे. खरं तर, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने बुधवारी नेटवर सराव सुरू केला आहे, म्हणजेच तो लवकरच भारतीय जर्सीमध्ये दिसू शकतो. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजीसोबत यष्टीरक्षणाचा सराव करताना दिसत आहे. आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी राहुलचे नेटवर पुनरागमन हे भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत. विशेषत: जेव्हा टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघाबाहेर आहे आणि तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता नाही.

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स चे नेतृत्व करत असलेल्या राहुलला स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाली होती. त्याच्यावर मे महिन्यात यशस्वी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आहे, जिथे त्याने आता सराव सुरु केला आहे. 19 जुलै रोजी बरे झाल्यानंतर त्याने फलंदाजीच्या सराव सत्राचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता. बुधवारी त्याने यष्टीरक्षणाचा सरावही सुरू केला. दुखापती असूनही, 31 वर्षीय खेळाडू अजूनही यष्टीरक्षक-फलंदाजांच्या स्थानासाठी पहिल्या क्रमांकाचा दावेदार आहे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या सोशल मीडिया अपडेट्समुळे ते आशिया कपपर्यंत तंदुरुस्त होतील. तसेच विश्वचषकासाठीही निवडीसाठी उपलब्ध होतील, पण आता त्याच्या तंदुरुस्तीबाबत बीसीसीआय कोणतीही घाई करू इच्छित नाही, असे आतल्या सूत्रांचे म्हणणे आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकापूर्वी तंदुरुस्त झाले नाही, तर आशिया चषकात त्यांच्या जागी इतर खेळाडू घेण्याची शक्यता आहे. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत इशान आणि संजूने चांगली कामगिरी केली आहे.

Exit mobile version