सीईटीपी कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा
| रोहा | वार्ताहर |
धाटाव एमआयडीसी येथील रासायनिक कंपन्यांतील सांडपाण्यावर सीईटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया न करता सदर दूषित सांडपाणी थेट गोफणच्या खाडीत सोडले जाते. या दूषित पाण्यामुळे रोजच खूप मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्यामुळे कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोळी बांधवांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास धाटाव एमआयडीसी येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) कार्यालयाची तोडफोड तसेच, दूषित सांडपाणी जलवाहिनी उखडून फेकून देण्यात येईल, असा गर्भीत इशारा रोहा तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी दिला आहे.
संतप्त कोळी समाज बांधवांनी धाटाव येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या प्रशासकीय कार्यालयालावर हल्लाबोल मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. मच्छिमारी करणार्या बांधवांवर अन्याय होत असल्यामुळे त्यांना संबधित प्रशासनाकडून दरमहा अनुदान मिळावे तसेच होडी परवाने व पारंपरिक पद्धतीने मत्स्यव्यवसाय करणार्यांची गाव तपासणी व चौकशी अहवाल अद्याप तयार न केल्यामुळे यावेळी संताप व्यक्त केला. दरम्यान, कोळी बांधवांनी घेतल्या आक्रमक भूमिकेमुळे संबधित प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
रोहा तालुक्यातील कुंडलिका खाडीत होडी, पाग, आसू, घोलवाने, पगोली, वायजाला इत्यादी साहित्यांचा वापर करून शेकडो कोळी बांधव मच्छिमारीचा व्यवसाय करतात. असे असताना गोफण येथील खाडीत धाटाव एमआयडीसीत असलेल्या अनेक रासायनिक कंपनीतील सांडपाणी सीईटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडले जात असल्याने कुंडलिका खाडीतील मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या दूषित पाण्यामुळे एकप्रकारे कोळी बांधवांवर अन्याय होत आहे. याविषयी संतप्त कोळी बांधवांनी विविध प्रशासकीय कार्यालयांवर धडक मोर्चा काढून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. तरीदेखील झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग येत नाही. झोपण्याचे सोंग घेणार्या प्रशासनाला जाग यावी याकरिता शुक्रवारी पडम, खारापटी, न्हावे, सोनखार, दिव, नवखार, शेडसई, महादेवखार, गोफण, कुंभोशी, खारगांव, निडी तर्फे अष्टमी, झोलांबे कोपरे, झोलांबे, लक्ष्मी नगर, यशवंतखार, सानेगाव व अन्य गावातील कोळी समाज बांधव व भगिनींनी सीईटीपी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. आमचे प्रलंबीत प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी न लागल्यास सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यालयाची तोडफोड करून सांडपाणी वाहतूक करणारी जलवाहिनी उखडून फेकून देऊन, असा इशारा कोळी समाज बांधवांनी दिला आहे.
यावेळी कोळी महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यकांत वाघमारे, तालुका अध्यक्ष सचिन चोरगे, महिला तालुका अध्यक्षा सायली चोरगे, सिद्धीका धसाडे, न्हावे ग्रा.पं. सरपंच नितीन डबीर, विभागीय अध्यक्ष प्रेमनाथ राक्षीकर, ज्ञानेश्वर कोळी, मारुती वाघमारे, मारुती म्हात्रे, योगेश भोय, प्रदीप भोईर, संदेश भोईर, सौ. डोळकर, सौ. विना कारभारी, पूनम जगदीश चोरगे, प्रियांका दाभाडे, अंकिता दाभाडे, मेघा खरीवले, तुषार खरीवले इत्यादी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे रोज शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत. दूषित पाणी प्यायल्याने गुराढोरांना त्रास होत आहे. खाडीलगत असलेली शेती वाया गेली आहे. तसेच, या भागात एमआयडीसीकडून पिण्याचा पाणीदेखील मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहे.
– सूर्यकांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख, कोळी महासंघ