कृषीवलने आवाज उठवताच बांधकाम विभागाला जाग
| चौल | प्रतिनिधी |
तालुक्यातील नागाव-सहाण बायपासवरील कमकुवत पाल्हे पुलाची डागडुजी सुरु असताना, अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कत सुरु आहे. पुलाच्या परिसरात जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही सूचना फलक लावले नसल्याने ही वाहतूक सुरू असल्याची चर्चा होती. याविरोधात कृषीवलने रविवारी अधिकाऱ्यांना विचारणा करताच, रातोरातच याठिकाणी ‘पूल अवजड वाहतुकीसाठी बंद’ अशा आशयाचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. कृषीवलने प्रश्न लावून धरल्याने जनतेतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे हे सूचना फलक नुसते बाहुले म्हणून उभे न राहता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईसुद्धा करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पाल्हे पूल हा अलिबाग, मुरुड तालुक्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी नागाव आणि मुरुडला पर्यटनासाठी येणारे पर्यटक याच मार्गाचा अवलंब करतात. तसेच आसपासच्या गावांनाही या पुलाचा मोठा आधार आहे. परंतु, सातत्याने या पुलावरुन जेएसडब्ल्यू साळाव कंपनीतून मालवाहतूक करणारे ट्रकची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पुलावरुन ट्रक जाताना पूल अक्षरशः हलत असून, हादरे बसत आहेत. त्यामुळे ही अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. ही बाब बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्या निदर्शनास आणली असता, त्यांनी तात्काळ कार्यवाही करुन याठिकाणी सूचना फलक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी देऊन लावून घेतले आहेत. मोनिका धायतडक यांच्या कार्यतत्परतेचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सूचना फलक बाहुले राहू नये
कृषीवलने याबाबत कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याशी संपर्क साधला असता, पाल्हे पुलाची डागडुजी सुरू असून, काम 50 टक्केच झाले आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगून तात्काळ सूचना फलक लावण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
