| मुंबई | प्रतिनिधी |
गुड मॉर्निंग विरुद्ध संस्कृती आणि गोलफादेवी विरुद्ध अमर मंडळ (काळाचौकी) या कुमार गटातील उद्घाटनीय सामन्याने शिवनेरी सेवा मंडळ आयोजित स्व. मोहन राजाराम नाईक सुवर्ण चषक कबड्डी स्पर्धेला दि.15 रोजी सायं. 6 वाजता प्रारंभ होईल. कोरोनाचा 2 वर्षाचा काळ वगळता गेली 53 वर्षे मंडळ सातत्याने भवानीमाता क्रीडांगण, शिंदेवाडी, दादर(पूर्व) येथे या स्पर्धा आयोजित करीत आहे. यंदा त्यांचे हे 54 वे वर्ष आहे.
यावर्षी मंडळाच्या वतीने विशेष व्यावसायिक गट, व्यावसायिक प्रथम श्रेणी, महिला व कुमार अशा विविध गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष व्यावसायिक गटात 12, प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात 16, कुमार गटात 16, महिला गटात 12 संघानी आपला सहभाग नोदविला आहे. या गटातील विजेते, उपविजेते, उपांत्य उपविजयी(दोन संघ) या सर्वाँना स्व. मोहन राजाराम नाईक चषक व गटानुसार रोख रकमेच्या पारितोषिकाने गौरविण्यात येईल. शिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम, चढाई व पकड तसेच प्रतिदिनीचा मानकरी यांचा देखील योग्यतेनुसार सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे उदघाटन कबड्डीप्रेमी आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.