| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएलनंतर भारतीय संघाला इंग्लंड दौरा करायचा आहे. त्याविषयी अजूनही भारताचा संघ घोषित केला नाही. संभाव्य संघाविषयी रोज काही ना काही अपडेट समोर येत आहे. या दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा संघाचा भाग नसणार आहेत. कारण या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघामध्ये खेळाडू आणि फलंदाजीच्या स्थानाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी के एल राहुलला अधिकृतरित्या संकेत दिला आहे की, त्याला सलामीवीर फलंदाजाच्या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. जर ही योजना यशस्वी ठरली तर राहुल सोबत यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी सलामीसाठी पाहायला मिळू शकते. तसेच, चौथ्या स्थानावर शुबमन गिल खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साई सुदर्शन किंवा करून नायर या दोघांमधील एका खेळाडूला तीन नंबरचे स्थान मिळू शकते. त्याचबरोबर काही नव्या खेळाडूंना सोडून संघात तीच नावे असतील, जी नोव्हेंबर-जानेवारीमध्ये बॉर्डर-गावस्कर चषकासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती.