अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

सरकारविरोधात मजदूर संघ एकवटला; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी रद्द करा, आशा, अंगणवाडी सेविकांना कर्मचारी म्हणून घोषित करा, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्ह्यातील मजदूर संघ रस्त्यावर उतरला. सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने सरकार जगाव आंदोलन करण्यात आले. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने बुधवारी (दि.25) करण्यात आली.


यावेळी अध्यक्ष संदिप मगर, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, सचिव अशोक निकम, संघटनमंत्री डी. पी. सोनावणे, कोषाध्यक्ष अवधुत नाईक, संदीप खंडागळे, किरण पाटील, अरुण घाग आदी पदाधिकारी व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.


घरेलु कामगार मंडळ पुनर्गठित करून बंद योजना सुरु करा. बांधकाम कामगार मंडळातील बोगस नोंदणी रद्द करून मंडळाच्या योजनांचे लाभ पोहचण्यात यावे. फेरीवाल्यांना व्यवसाय करू द्या. फेरीवाला धोरण जाहीर करण्यात यावे. आशा, अंगणवाडी सेविकांना कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावे. त्यांना वेतन आदी लाभ देण्यात यावे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. बंद असलेली इंडिया लेबर कॉन्फरन्स पुन्हा सुरु करण्यात यावी. त्रिपक्षीय समित्यांचे गठण करण्यात यावे. ईएसआय मर्यादी 42 हजार करण्यात यावी.

सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन देण्यात यावे. सर्व माथाडी कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात यावी. सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शासनाच्या वेगवेगळ्या धोरणाविरोधात नाराजीही व्यक्त करीत घोषणा देण्यात आली.

Exit mobile version