प्रवाशांची गैरसोय
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
21व्या शतकातील आधुनिक आणि भव्य-दिव्य पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. स्थानकावर उभारण्यात आलेले पादचारी पूल (फूटओव्हर ब्रिज) आणि त्यावरील पायऱ्यांवर अद्यापही पूर्णपणे शेड नसल्याने मुसळधार पावसात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसात छत्री उघडून पायऱ्या चढत-उतरत रेल्वे गाडी पकडताना प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह प्रवास करणारे पालक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ओल्या पायऱ्यांमुळे घसरून अपघात होण्याची भीतीही कायम आहे.
उन्हाळ्यात कडक उन्हाचा सामना करत गाडीची वाट पाहणारे प्रवासी आता पावसाळ्यातही पावसाच्या तडाख्यातूनच प्रवास करण्यास मजबूर आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून स्थानकाचा विकास करण्यात आला असला, तरी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या शेडसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पनवेल हे महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे फूटओव्हर ब्रिज व पायऱ्यांवर तातडीने शेड उभारून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत असून आता तरी रेल्वे प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.







