चिरनेरमध्ये लाखो लिटर पाणी वाया

। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हेटवणे धरणातील पाईप लाईनला चिरनेर गावाजवळील रस्त्यावरून जाणार्‍या भरधाव वेगातील डंम्परने धडक दिल्याने पाईप लाईन फुटली. हा अपघात मंगळवारी (दि.10) सकाळी सव्वादहा च्या सुमारास घडला.त्यामुळे पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.या घटनेची माहिती मिळताच सिडको पाणीपुरवठा विभागाने तातडीने कार्यवाही करीत पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर, उरण येथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चिरनेर-गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दीड मिटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून मोठ्या दाबाने पाणी पुरवठा होतो. मंगळवारी चिरनेर गावाजवळील रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणार्‍या डंम्परची धडक पाईप लाईनला बसली असता पाईपामधून पाण्याचे फवारे उडत होते. हा अपघात चिरनेर गावाजवळील माकडडोरा आदिवासी वाडीजवळ झाला.

रस्त्यावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी या घटनेची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाईप लाईनमधून सुरु असणारा पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती सिडको पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

Exit mobile version