50 हजारांची लाच घेताना पकडले
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देण्यासाठी भूकरमापकाने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. माणगाव एसटी बसस्थानक येथे ही लाच घेताना त्याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
विशाल भिमा रसाळ (29) असे या आरोपीचे नाव आहे. हा म्हसळामध्ये भूकरमापक तथा प्रतिलिपी लिपीक या पदावर कार्यरत आहे. अखत्यारपत्र दिलेल्या व्यक्तीचे म्हसळ्यामधील वरवटणे येथे सर्वे क्रमांक 52/1ब या जमिनीची मोजणी आकारफोड व क प्रत देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, ही प्रत देण्यासाठी नऊ एप्रिलला विशाल याने 50 हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, सागर पाटील आदी पथकाने माणगाव एसटी बसस्थानक येथे त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फीव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.