पावणे तीन हजार कोटींचा महसूल जमा
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याची वाटचाल तिसर्या मुंबईच्या दिशेने सुरू झाली आहे. तब्बल एक अब्ज रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प येत्या काळात जिल्ह्यात येऊ घातले आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई आणि रायगड मधील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहार जोमात सुरू झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून तब्बल 2 हजार 737 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा एमएमआरडीए विस्तारीत क्षेत्रात समावेश करण्यात आला. अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प, रेवस रेड्डी सागरी मार्ग प्रकल्प, मुंबई गोवा ग्रीनफिल्ड दृतगती मार्गिका प्रकल्पांमुळे येणार्या काळात मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर अधिकच जवळ येणार आहे. याचा एकत्रित परिणाम रायगड जिल्ह्यातील गुंतवणूकीवर झाला आहे.
त्यामुळे जागा जमिनींच्या व्यवहारातून जमा होणार्या महसूलात मोठी वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये दस्त नोंदणीतून 2 हजार 450 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. 2023-24 मध्ये 3 हजार 206 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात गेल्या नऊ महिन्यात 2 हजार 737 कोटींचा महसूल दस्त नोंदणीतून जमा झाला आहे. उर्वरीत तीन महिन्यांत यात आणखीन एक हजार कोंटीची भर अपेक्षित असणार आहे. यावरून जिल्ह्यात जागा, जमिनींच्या वाढत्या व्यवहारांची प्रचिती येऊ शकते. रेडीरेकनरचे दर स्थीर असूनही महसूलाची रक्कम सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी साधारणपणे सातशे ते आठशे कोटींचा महसूल वाढ होताना पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात एकूण 22 दुय्यम निबंधक तथा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यापैकी सर्वाधिक महसूल हा जेएनपीटी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून येत आहे. या कार्यालयातून नऊ महिन्यात 621 कोटी महसूल प्राप्त झाला आहे. तर उरण 288 कोटी, पनवेल 1- 169 कोटी, पनवेल 2 244 कोटी, पनवेल 3 326 कोटी, पनवेल 4 215कोटी पनवेल 5 189कोटी , अलिबाग 153 कोटी, खालापूर 291 कोटी, कर्जत 2 87 कोटी, कर्जत 1- 38 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.