अबू धाबीसाठी एअर इंडिया एक्सप्रेसचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) इतिहासात बुधवार, 15 जुलै 2026 हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. या विमानतळावरून पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा शुभारंभ झाला असून, एअर इंडिया एक्सप्रेस ही येथून आंतरराष्ट्रीय उड्डाण करणारी पहिली विमान कंपनी ठरली आहे. नवी मुंबईहून संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबीसाठी पहिले थेट विमान रवाना होताच विमानतळाने जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात अधिकृतपणे पदार्पण केले.
या ऐतिहासिक उड्डाणामुळे नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत देशांतर्गत 46 गंतव्यस्थानांशी जोडणी करत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देणाऱ्या नवी मुंबई विमानतळाने आता आंतरराष्ट्रीय सेवेकडे यशस्वी पाऊल टाकले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात अबू धाबी ही सेवा आठवड्यातून दोन दिवस-बुधवार आणि शुक्रवार असे उपलब्ध राहणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन 29 जुलै 2026 पासून रविवारीही अतिरिक्त उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सेवा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल.
जागतिक प्रवासाची यशस्वी सुरुवात
वेळापत्रकानुसार अबू धाबीहून विमान सकाळी 5.45 वाजता सुटून सकाळी 10.20 वाजता नवी मुंबईत पोहोचेल. तर नवी मुंबईहून विमान पहाटे 2.55 वाजता उड्डाण करून स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.35 वाजता अबू धाबी येथे दाखल होईल. या थेट विमानसेवेमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, आखाती देशांतील भारतीय नागरिक, व्यावसायिक, पर्यटक आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी हा मार्ग अधिक सोयीचा ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागतिक प्रवासाची ही यशस्वी सुरुवात असल्याने सर्व स्तरांतून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.







