वनविभागाकडून सावधानतेचा इशारा देणारे बॅनर
। पनवेल । वार्ताहर ।
खारघर टेकडीवर बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांना सावध करण्यासाठी वनविभागाकडून टेकडी परिसरात सावधानतेचा इशारा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. खारघर टेकडी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात काही दिवसांपूर्वी एक वन्यप्राणी कैद झाला होता.
काही दिवसांपूर्वी खारघर टेकडीवरील फणसवाडीकडे जाणार्या रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात एक वन्यप्राणी कैद झाला होता. गवत आणि झाडा झूडपातून रस्त्यावर आलेला हा प्राणी काही अवधीतच अंधारात दिसेनासा झाला. सुरक्षा रक्षक अमोल काळे आणि बाळू पाटील यांनी आरबीआय कॉलनीजवळ मेट्रो स्टेशनपासून काही मीटर अंतरावर हा प्राणी पाहिला होता. या बाबतची माहिती वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला प्राणी हा बिबट्या असल्याची पृष्टी होईपर्यंत खारघर टेकड्यांवर जाणार्यांसाठी चेतावणी देणारे बॅनर लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर बाजूच्या पारसिक टेकडीपासून रोहिंजन आणि ठाणे जिल्ह्याच्या पुढील भागांपर्यंत ही टेकडी पसरली आहे. टेकडीवर दोन वाड्यांमध्ये आदिवासी समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनी डोंगराच्या पलीकडे जाताना बिबट्याचे पिल्लू दिसल्याचे दावे केले आहेत. दरम्यान, खारघर शहराचा विकास सुरु असताना आजूबाजूच्या खाडी किनार्यांमधून नागरिकांना सोनेरी कोल्ह्याचे दर्शन होत होते. त्यामुळे अनेक सोसायटीमधील नागरिक भयभीत होऊन अनेकजणांनी मॉर्निग वॉक करणे सोडले होते. त्या कोल्ह्याला वनविभागाने पकडून इतरत्र सोडले होते. त्यातच आता खारघर टेकडीवर पुन्हा एका जंगली प्राणी दिसण्याची घटना घडली आहे. टेकडीवर असलेल्या आदिवासी वाड्यांत राहणार्या आदिवासी नागरिकांना बिबट्या झाडा-झुडूपांत दिसला असल्याचे सांगितले होते. तात्काळ वन विभागाने पाहणी करून त्यांना बिबट्याचे ठसे किंवा त्याची विष्टा असे काहीच सापडले नाही. मात्र, एकाने मोबाइलमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्याचे दर्शन दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
टेकडीवर प्रवेशबंदी
टेकडीवर असलेल्या चाफेवाडी, फणसवाडी या दोन आदिवासी वाड्यानवर जाण्यासाठी सिडकोने डांबरी रस्ता तयार केलेला आहे. टेकडीवरून नवी मुंबई, मुंबई, पनवेल शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते. यामुळे परिसरातील रहिवासी जॉगिंग, मेडिटेशन, योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेकडीवर येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी टेकडीवर जाण्यासाठी रहिवाशांना परवानगी देण्यात आली होती. आता मात्र टेकडीवर जाण्यासाठी पूर्ण पणे बंदी घालण्यात आली आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
टेकडीवर असलेल्या वाड्यानमधील नागरिक कामानिमित्त रात्री अपरात्री टेकडीवरील रस्त्यावर ये-जा करत असतात. बिबट्या असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, टेकडीवर करण्यात आलेल्या प्रवेशबंदीमुळे ग्रामस्थांकडे येणार्या पाहुण्यांना देखील अडवण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.