| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोधमोहीम अभियान शुक्रवारी (दि.31) सुरू करण्यात आले आहे. सदर अभियान 14 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार असून, रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 16 हजार घरांना आशा व आरोग्य कर्मचारी भेट देणार असून, 23 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 100 पथके तयार करण्यात आली आहेत. 403 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोगासंदर्भात संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, जिल्हा कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. प्राची नेहूलकर, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. सचिन संकपाळ, अलिबाग गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रियांका साळुंके, डॉ. पद्मश्री आंधाळकर उपस्थित होते.
कुष्ठरुग्ण शोधमोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षन करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. नागरिकांनी कृष्ठरोग आजाराबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे, सदर मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून, एकही बाधित व्यक्ती उपचारविना राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड