| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरामधून वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रात हे काय सुरू आहे. कर्जत शहरातील गणेश घाटाजवळ ते बांधकाम सुरू असून, रात्री बांधकाम करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.
कर्जत शहरातील उल्हास नदीच्या पात्रात आतमध्ये भिंत बांधली जाते आहे. उल्हास नदी बचाव अभियानकडून त्या भिंतीला विरोध करण्यात आला होता. नदीपात्रात कुठलेही बांधकाम करण्यासाठी परवानगी पालिकेने घेतली आहे काय? असे प्रश्न समोर आले आहेत. त्या भिंतीमुळे नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखले जाणार आहे. नदी स्वच्छ ठेवणे हे नगरपालिकेचे काम आहे की तिच्या काठांवर अशी बांधकामे करून तिचा श्वास गुदमरून जाऊ शकतो. घाट बांधून कुणाला फायदा मिळतो आहे? गावात एखादी बाग तयार करण्याऐवजी, असलेल्या बागांची देखरेख करण्याऐवजी आणि पात्रालगत आणखी झाडं लावण्याऐवजी हे काँक्रिटीकरण का होते आहे? या सिमेंटने नदी परिसर थंड न राहता उन्हाळ्यात आणखी तापेल, हे दिसत नाहीये का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कर्जत विकासाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे एका सुंदर गावापासून बकाल शहराकडे प्रवास सुरू आहे. गावानं शहर होणं अपरिहार्य आहे. पण, बकाली आणि अनावश्यक सिमेंटीकरणाला आळा घालण्याची गरज बोलली जात आहे.