जिल्ह्यातील 466 ठिकाणी होणार गणेशमूर्तीची स्थापना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.1) माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ग्रामीण, शहरी भागात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 466 ठिकाणी मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. या निमित्ताने 20 हून अधिक ठिकाणी मिरवणुकांचा जल्लोष पहावयास मिळणार आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. अलिबागमधील कुलाबा किल्ल्यातील सिध्दीविनायक मंदिरासह पाली येथील बल्लाळेश्वर तसेच खालापूरमधील महड येथील गणरायाच्या मंदिरात तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरात गणेशमूर्तींची स्थापना करून धार्मिक विधी केली जाणार आहे. सकाळपासून भाविकांसाठी मंदिर खुले केले जाणार आहे. काही ठिकाणी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. दिघीसागरी, महाड, नांदगाव, नागोठणे, तळवली, आंबेपूर, बोरघर, सातिर्डे, ताजपूर, फणसापूर, वळवली, भागवाडी, कुदे, शेतजूई अशा अनेक ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकांसमवेत कीर्तन, भजनांसह बेंजोचा नाद घुमणार आहे. जिल्ह्यात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी रायगड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकांच्यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे.