| पनवेल | वार्ताहर |
महावितरणने केबल टाकण्यासाठी खोदलेले नवीन पनवेल परिसरातील रस्ते पूर्ववत करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. नविन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी महावितरण केबल टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकामे केली आहेत. केबल टाकण्याचे कामे पूर्ण झाली आहे. मात्र, गेली 12 ते 15 दिवस झाले रस्त्यावर मातीचे ढिगारे व दगडी पडून असल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढत आहेत. तसेच, मातीच्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत महापालिका अभियंता साळुंके यांना तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या आदेशाला पनवेल महापालिका अधिकार्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे? असा सवाल येथील रहिवाशांनी केला असून तत्परतेने खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी केली जात आहे.