भारतीयांना बुद्धिबळाची प्रेरणा मिळो- प्रज्ञानंद

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बुद्धिबळाबाबत आता भारतीयांनाही आकर्षण वाटू लागले असून,ते खेळण्याची प्रेरणा देशवासियांना मिळेल,अशी अपेक्षा विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने व्यक्त केली आहे.

अंतिम सामन्यामध्ये अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला. या पराभवानंतरही वयाच्या 18 व्या वर्षी भारताचं नाव बुद्धीबळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणाऱ्या आर. प्रज्ञानंदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक मान्यवरांनी आर. प्रज्ञानंदचं अभिनंदन केलं आहे. असं असतानाच पराभूत झाल्यानंतर आर. प्रज्ञानंदने नोंदवलेल्या पहिल्या प्रतिक्रियेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रतिक्रियेमधून वयाच्या 18 व्या वर्षी आर. प्रज्ञानंदला स्वत:च्या विजयापेक्षा खेळाची अधिक काळजी असल्याचं दिसून येत आहे.

आर. प्रज्ञानंदने भारतीय लोक बुद्धीबळाकडे अधिक काळजीपूर्वक पाहू लागतील असं मत व्यक्त केलं आहे. बाकू येथे झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी आर. प्रज्ञानंदने संवाद साधला. अंतिम सामन्यामध्ये पोहोचलो याचं फार समाधान आहे. मी आज जिंकू शकलो नाही. मात्र बुद्धीबळामध्ये असं घडत असतं, अशी प्रतिक्रिया आर. प्रज्ञानंदने नोंदवली. हे या खेळासाठी फार चांगलं आहे. मला फार आनंद आहे की एवढे लोक हा खेळ पाहत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं हा खेळ पाहायला येत आहेत. यामुळे लोकांना बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल. माझ्यामते यामुळे लोक भारतातील बुद्धीबळ क्षेत्राकडे अधिक लक्षपूर्व पाहतील. ही फार चांगली बाब आहे, असं आर. प्रज्ञानंद म्हणाला आहे.

मागील 2 महिन्यांपासून सातत्याने बुद्धीबळ स्पर्धा खेळत असलेल्या आर. प्रज्ञानंदने, मी सातत्याने खेळत आहे. त्यामुळेच मला या स्पर्धेसाठी तयारी करण्यास वेळ मिळाला नाही. मला माझ्या विरोधात खेळणाऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी केवळ एका आठवड्याचा वेळ मिळाला. मला वाटलं नव्हतं की मी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण या कामगिरीवर मी फार समाधानी आहे, असं सांगितलं. मी फार थकलो आहे. मला आराम करायचा आहे. सोमवारपासून पुन्हा नवीन स्पर्धा सुरु होत आहे, असंही आर. प्रज्ञानंदने सांगितलं.

Exit mobile version