। नेरळ । वार्ताहर ।
आम्हाला कोणाचेही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत मांडले. छत्रपती संभाजी युवराज यांचाच कर्जत तालुका संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाच्या तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेली संवाद यात्रा कर्जत तालुक्यात आली. संवाद दौर्याची सुरवात पळसदरी येथील स्वामी समर्थ मठ या पुण्यभूमी पासून केली.कर्जत चारफाटा येथे या संवाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनसागर लोटला होता. छत्रपती संभाजी युवराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र मला नेरळमध्ये दिसून आल्याचे म्हटले. सकल मराठा समाजाकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना विनंती केली आहे. त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि मराठा समाजातील गरीब जनतेला न्याय द्यावा असे आवाहन यावेळी केले. या संवाद यात्रेत सुनील पाटील, विनोद साबळे, धनंजय जाधव, करण गायकवाड राजेश लाड, अनिल भोसले, मधुकर घारे, ज्ञानेश्वर भाळीवडे, प्रथमेश मोरे, किरण ठाकरे, प्रदीप ठाकरे, जगदीश ठाकरे, आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सोबत होते.कर्जत तालुका संवाद यात्रेचा समारोप किरवली येथील शेळके हॉल येथे सभेने झाला. त्यावेळी सकळ मराठा समाजाचे वतीने शिवकन्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच मयूर शेळके यांचा सत्कार केला.