। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग आणि मुरूड तालुक्याला जोडणारा कुंडलिका खाडीवरील महत्त्वाचा असणारा साळाव-रेवदंडा पूल दुरूस्तीच्या कारणासाठी अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूकदेखील बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गांचा मोठा वळसा पडणार आहे. यामुळे लाइफलाईनच विस्कळीत होणार असल्याने मुरुडकर जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
मंगळवार 30 मार्चपासून साळाव पुलाच्या दुरुस्तीसाठी पूल हा पूर्णतः बंद केल्याने वाहनचालक यांच्यासाहित प्रवासी त्रस्त झाले होते. साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम हे 1986 साली करण्यात रआले असून, या पुलाची लांबी 510 मीटर एवढी आह. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या काळात झाला आहे. त्यामुळे रोहा, मुरुड आणि अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव-रेवदंडा खाडी पुलामुळे मुरुड तालुक्याचा आर्थिक विकास, सामाजिक, औद्योगिक झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुलाखालून जाणार्या कोळशाच्या जाणार्या बार्जेसने दोन वेळा पुलाच्या खांबाला ठोकर मारल्याने पुलाचे खांब कमकुवत झाले आहेत, तसेच अनेक वेळा या पुलावरून जेएसडब्ल्यू कंपनीचे तसेच इतर अनेक अवजड वाहने या पुलावरून ये-जा करीत असल्याने पूल हा कमकुवत झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम हाती घेऊन फक्त मेक ओव्हर करण्याचे काम केले. या परिसरातील नागरिकांनी तसेच वाहन चालक यांनी साळाव रेवदंडा पूल कमकुवत झाल्याने नव्याने पूल बांधण्याची मागणी केली होती.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा-साळाव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार, पुलाचे स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग करण्याचे निर्देश वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई बांदारे यांना देण्यात आले होते. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये सदर कामाची निविदा ही संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेंथनिंग प्रा.लि. यांना देण्यात आली असून, त्यांनी कामास सुरुवात केली आहे. या मार्गावरुन जाणार्या सर्व एसटी फेर्या बंद करण्यात आल्या असून, त्याऐवजी साळावमार्गे रोहा अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे सदर मार्गाचे अंतर आणि भाडेवाढदेखील होणार आहे. त्यामुळे मुरुडकरांचा पैसा आणि वेळदेखील जास्त खर्च होणार आहे. त्याप्रमाणे अनेक फेर्या रद्द करण्यात आल्याने याचा मुरुड एसटी आगाराच्या उत्पन्नावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.