उरण तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावर परिणाम
| उरण | प्रतिनिधी |

उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये तसेच बँकांच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. तर दुसरीकडे व्यवसाय उद्योजकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ही नित्याची असली तरी पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतरही उरणमधील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या आठवड्यात शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील तहसील, पोलीस ठाणे, बँका, झेरॉक्स दुकाने येथील कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तर बोकडविरा गावातील वीज सलग दोन दिवस गायब झाली होती. त्याचप्रमाणे उरणच्या पूर्व विभागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक तास नागरिकांना विजेअभावी रात्र काढावी लागत असल्याची माहिती चिरनेरमधील सामाजिक कार्यकर्ते जीवन केणी यांनी दिली.

पावसामुळे अनेकदा जम्पर उडण्याच्या तसेच इतर कारणानेही वीजपुरवठा खंडित होत असली तरी ती तातडीने पूर्ववत करण्यात येत आहे.

– विजय सोनवणे, उरण महावितरणचे कार्यकारी अभियंता


Exit mobile version