रस्ता खोदणार्यांवर अद्याप कारवाई नाही
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील शासनाने काही लाख रुपये खर्च करून बनविलेला रस्ता दि. 7 मार्च रोजी खोदून आणि आदिवासी लोकांचा वाहतुकीचा रस्ता बंद केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या विभागाचे वतीने शासनाने खर्च केलेला रस्ता खोदणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी ग्रामस्थांनी निवेदन देऊन शासनाकडे केली आहे. दरम्यान, कारवाई न केल्यास आदिवासी संघटना उपोषणाला बसणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
कर्जत तालुक्याचे शेवटचे गाव असलेल्या बेडीसगाव येथे असलेला रस्ता 15 वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक आदिवासी ग्रामस्थ करीत होते. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 76 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.त्या कामाची सुरुवात संबंधित कामाची निविदा घेणार्या ठेकेदाराने मागील एक वर्षांपासून सुरू केले नाही. त्याचा फायदा घेऊन ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील काही लोकांनी 7 मार्च रोजी जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून काढला आणि 300 मीटर लांबीचा रस्ताच गायब केला.
याप्रकरणी आदिवासी सेवा संघाने बेडीसगाव आणि नऊ वाड्यांच्या आदिवासी लोकांचा प्रश्न हाती घेतला आहे. शासनाने निधी खर्च करून बनविलेला रस्ता खोदणार्या लोकांवर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन संघटनेचे सचिव गणेश पारधी आणि कर्जत तालुका अध्यक्ष जैतु पारधी यांनी पोलीस उपअधीक्षक यांना दिले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला नाही तर आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.