जिल्हाधिकार्यांची मध्यस्थी निष्फळ
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील विळे-भागाड येथील पॉस्को कंपनी अंतर्गत असणार्या इजिटेक या कंत्राटी कंपनीने निलंबित केलेल्या 17 कामगार 14 मार्च रोजी कंपनी प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 21 मार्च रोजी एकत्रित बोलावून ही बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द दिला होता. जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी उपोषणकर्ते कामगारांना विनंती करून उपोषण मागे घेण्यास लावले. त्याप्रमाणे पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. मात्र, ही बैठक न झाल्याने शासनाने उपोषणकर्त्यांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याने पुन्हा या कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
इजिटेक कंपनीने गेली 7 ते 8 वर्ष हे निलंबित झालेले कामगार काम करीत असून, या कंपनीने त्यांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी कामावरून निलंबित केले होते. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. याकरिता आपल्याला न्याय मिळावा म्हणून दि. 14 मार्चपासून हे कामगार आपल्या कुटुंबियांसह अन्न, पाणी, उन्हाची तमा न बाळगता पॉस्को कंपनीच्या मुख्य गेटसमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्यांपैकी अनेकांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना औषध उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. या कडक उन्हातही उपोषणकर्ते आपल्याला न्याय मिळावा यासाठी उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते. या सर्वांची ढासळत असलेली प्रकृती पाहून शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी यांनी उपोषणकर्ते कामगार यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शासनाच्या या विनंतीचा मान ठेवून उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, अजूनही कामगारांना कंपनीने कामावर घेतले नसल्याने कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात असून कंपनी विरोधात लवकरच तीव्र आंदोलन उभारू, असा प्रसार माध्यमांशी बोलताना इशारा दिला.