जास्त क्षमतेचे वीज रोहित्र बसवण्याची नागरिकांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील पोलीस मैदान परिसरातील बाजारपेठ भागात काम दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील वीज रोहित्रांची क्षमता वाढवण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ठाकरे पक्षाचे उप शहर प्रमुख कृष्णा जाधव यांच्याकडून देण्यात आले.
कर्जत शहरातील वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे.त्यात मुख्य बाजारपेठ असलेल्या पोलीस मैदान परिसरात प्रामुख्याने विजेची समस्या निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी महावितरण उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कर्जत शहरातील पोलीस मैदान आणि कपालेश्वर मंदिर मराठी शाळा नंबर एक या भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या भागात जास्त दाबाची क्षमता असलेले वीज रोहित्र बसवण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्जत शहर उपशहर प्रमुख कृष्णा श्रीराम जाधव यांनी सादर केले.
कमी दाबाने पुरवठा सायंकाळी होत असल्याने अनेक उपकरणे इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचे नुकसान होत आहे. याचा विचार नक्कीच करून 315 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देत आहोत, असं आश्वासन सहायक अभियंता पाल यांनी दिले आहे. महावितरण कार्यालयात अधिकारी पाल यांना त्या भागाची पाहणी करून लवकरच कर्जत शहरातील विजेच्या दाबाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले आहे. या भागातील वीजपुरवठा कमी दाबाचा आहे हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून घेण्याचे काम महावितरण करणार आहे. विजेचा भार लक्षात घेऊन 315 केव्हीचे वीज रोहित्र बसवून प्रश्न सोडवला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.







