। महाड । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या अवमानकारक उद्गगारानंतर राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना महाड येथे आणण्यात येणार असल्याने कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मोठा पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाडला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.

नवनियुक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार कोकणात कालपासून जन आशिर्वाद यात्रा सुरु केली होती. या यात्रेदरम्यान बेताल वक्तव्य करतानाच नारायण राणे यांचा तोल जावून थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानाखाली मारले असते असे अवमान उद्गार काढले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
नाशिक येथे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यभरात राणेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्ह्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यांना महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असल्याने येथे मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.