। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग यांच्या सौजन्याने सचिन इलेव्हन क्रिकेट क्लब निळगुण यांनी कै. सचिन गुगळे यांच्या स्मरणार्थ आयोजित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत महाराणाप्रताप नगर माणगाव संघाने अंतिम सामन्यात खालची वाडी डोंगरोली संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये 10 हजार व आकर्षक चषक पटकावला. या स्पर्धेत असोसिएशनच्या 16 संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील उपविजेते खालची वाडी डोंगरोली संघास रोख रुपये 7 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते आमडोशी संघास रोख रुपये 5 हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते नवघर संघास रोख रुपये 3 हजार व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून खालची डोंगरोली संघाचा खेळाडू बाळाराम डोंगरे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महाराणाप्रताप नगर माणगाव संघाचा खेळाडू अर्जुन पवार तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मालिकावीर पुरस्कारासाठी महाराणा प्रताप नगर माणगाव संघाचा दीपक पवार यांची निवड करण्यात आली.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस समारंभासाठी देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश गुगले, असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास खानविलकर, उपाध्यक्ष विजय इंगळे, श्री समर्थ मित्र मंडळ निळगुण अध्यक्ष संदेश गुगळे, राजू मोरे रोहिदास पवार, समीर महाडिक, अरुण पवार आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, श्री समर्थ मित्र मंडळ निळगुणचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री समर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोर्बा विभाग व श्री समर्थ मित्र मंडळ निळगुणच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.